नाटय़प्रयोगाची वासलात - ( सारे प्रवासी घडीचे (१९६४) : जयवंत दळवी - पुस्तकातील उतारा ) Print E-mail
यांच्या द्वारा - सारे प्रवासी घडीचे (१९६४) : जयवंत दळवी - संकलन : शकुंतला मुळ्ये   

vastraharan

तेवढय़ात अकस्मात आरडाओरड झाली. त्या आवाजाने मला जाग आली. पाहतो तो गर्दीतून वाट काढीत, मोठमोठय़ाने ओरडत, आपली गदा नाचवीत, दु:शासन स्वत:लाच स्टेजकडे रेटीत होता. त्याचे लक्ष स्टेजवरच्या द्रौपदीकडे असल्यामुळे दु:शासनाचे पाय कोणाच्या हातावर, पायावर, झोपलेल्यांच्या पोटावर पडत होते. त्यामुळे दु:शासनाच्या तावडीत सापडलेल्या प्रेक्षकांत आरडाओरड आणि रडारड चालू होती.दु:शासनाच्या तडाख्यातून सुटलेले प्रेक्षक इतरांना गप्प करू लागले.

दु:शासनाने स्वत:चे जबरदस्त सामर्थ्य दाखविण्यासाठी जमिनीवरून धाडकन स्टेजवर उडी मारली, पण उडी मारता मारताच पाय अडकून त्याच्या धोतराची कासटी सुटली आणि प्रेक्षकांतून एकदम हास्याची लाट उसळली. सर्वासमक्ष आणि पुन्हा त्या स्टेजवर कासटी घालण्याच्या धडपडीत दु:शासनाने बरीचशी वाक्ये खाऊन टाकली. त्यामुळे दादू गुरवाचा चेहरा वस्त्रहरण झाल्यासारखा दिसू लागला.

द्रौपदीसारखा चेहरा दिसण्याऐवजी लेखकासारखा दिसू लागला. आपली चांगली वाक्ये दु:शासनाने अशी खाऊन टाकावीत हे दादूला रुचले नाही. म्हणून बाजूला तोंड करून तो चुकलेली वाक्ये सांगण्याचा प्रयत्न करू लागला. दु:शासनाच्या धोतराची कासटी सुटल्यामुळे तो आधीच ओशाळल्यासारखा झाला होता. त्यात खुद्द द्रौपदीनेच त्याची चुकलेली वाक्ये त्याला स्टेजवर पुन्हा सांगितली. त्यामुळे तो अधिकच ओशाळा दिसू लागला. असा हा ओशाळगत दु:शासन द्रौपदीच्या वस्त्राला हात घालील की नाही, अशी अनेकांना शंका आली. पण सुदैवाने ती शंका खोटी ठरली, कारण दु:शासनाचे काम करणारा आडदांड दादुल्या होता. हे पाहून मला सूक्ष्मसा आनंद झाला.

सारे प्रवासी घडीचे (१९६४) :  जयवंत दळवी

संकलन : शकुंतला मुळ्ये

लोकसत्ता

 
Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates