देवाशी संवाद : सायमन मार्टिन Print E-mail
यांच्या द्वारा - संकलन : शकुंतला मुळ्ये - लोकसत्ता   

अहिंसा म्हणजे आत्म्याचा हुंकार असतो. प्रेम आणि करुणेचा सहजसुंदर आविष्कार असतो. दुसऱ्यांच्या सुखाने सुखी होणे हे प्रेम आणि दुसऱ्यांच्या दु:खाने दु:खी होणे ही करुणा. तोच तर प्रभूचा मार्ग होता.

अहिंसेचा मंत्र, प्रभू प्रत्यक्षात त्याच्या प्रत्येक श्वासातून उच्चारत होता. त्याच्या शब्दांत आज्ञा नव्हती, हुकूम नव्हता, सजा आणि लालूचही नव्हती; तरीही त्याच्या जगण्यात एक धागा होता, जो आजही साऱ्या विश्वाला बांधून ठेवत आहे.

मुळात प्रभूची सारी धडपड दु:खमुक्तीसाठीच होती. लोकांची जगण्याची साधने हिसकावून घेऊन त्यांना विस्थापित करण्यात येणं; हा हिंसेचाच प्रकार आहे. अन्याय आणि शोषणाने जग ग्रासलेले आहे. युद्धामुळे आणि धुरामुळे माणसाचा श्वास कोंडलाय.

अहिंसेच्या भावनेमागे प्रेम आणि भ्रातृभावाची संकल्पना आहे. अहिंसा हा केवळ संतसज्जनांचा धर्म आहे आणि शस्त्राने केलेली ती हत्या, एवढाच हिंसेचा मर्यादित अर्थ लावून आम्ही अहिंसेचे गुणगान करीत राहिलो. आमच्या वृत्ती-प्रवृत्तींनी गंगेचा प्रवाह मलिन करीत राहिलो. आत्म्यावर साचलेला घाणीचा थर धुण्यासाठी पश्चात्तापाच्या अश्रूंशिवाय पर्याय नाही, हे कायम विसरत गेलो.

जेव्हा सारा परिसरच भीती आणि दहशतीच्या छायेत वावरत असतो, जेव्हा हिंसेचा अंमल मानवी व्यवहारावर व्यापून राहिलेला असतो तेव्हा प्रेम आणि करुणेची भाषा अस्तंगत झालेली असते. ज्या दिवशी अहिंसा हा तुझ्या जगण्याचा मंत्र होईल, त्या दिवशी तुझी कुणाला भीती वाटणार नाही आणि तुलाही कुणाची भीती वाटणार नाही. धारदार शस्त्राचे नांगराचे फाळ होतील. विध्वंसाच्या जागी सर्जन जन्म घेईल असं स्वप्न यशया संदेष्टा पाहतो. हे आपलं प्रत्येकाचं स्वप्न असायला हवं.

देवाशी संवाद  :  सायमन मार्टिन  :

संकलन : शकुंतला मुळ्ये - लोकसत्ता

 
Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates