|

माणूस जन्माला आला की तो स्वप्नांवर जगायला लागतो. त्या स्वप्नामध्ये तो इतका रमतो की ते स्वप्नच त्याला जगायला भाग पाडते. मनात ठरवल्याप्रमाणे अकल्पित काही चांगले घडते की धडपड वाढायला लागते. मनातले स्वप्न कधी भविष्यात किती खरे ठरेल हे कोणालाच सांगता येत नाही. म्हणून कोणी स्वप्न बघायते रांहत नाही.
मी आज ज्या युवकाची ओळख करून देणार आहे त्याते नाव आशिष आजगांवकर. जोगेश्वरीत तो वास्तव्य करतो. मालाडच्या यशवंत चव्हाण हायस्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. गोपाळ आजगांवकर हे त्याचे वडील. सरकारी सेवेत कामाला होते. आध्यात्माच्या दृष्टीने विचार करणे, वागणे त्यांना आवडते. श्री काडसिध्देश्वर स्वामी महाराज यांचे ते परमभक्त. त्यामुळे घरातले वातावरण हे आध्यात्मिक अशा विचारसरणीचे होते.
आशिष हा या घरातला सर्वात लहान चिरंजीव. बहीण, भाऊ नोकरीला असले तरी प्रापंचिक जबाबदा-या वडीलांकडे भरपूर होत्या. अलका आजगांवकर ही आशिषची आई. एकत्र कुटुंब पध्दतीमुळे कुटुंबाचा बराचसा ताण त्यांच्यावर होता. शैक्षणिक, कौटुंबिक जबाबदारी यासाठी या उभयत्यांची होणारी तारांबळ आशिषने बाळपणापासून अनुभवली होती. मनात भरपूर काही स्वप्ने साठवून ठेवले असली तरी, दहावी झाल्यानंतर प्रथम नोकरी असा काहीसा विचार त्याने केला होता आणि त्याप्रमाणे त्याला न्यू इंडिया इन्शूरन्समध्ये नोकरी चालून आली.
नोकरी सहज उपलब्ध झाली म्हणून शिक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशी शिकवण त्याला घरातूनच मिळाली होती. यशवंतराव मुक्त विद्यापीठातून त्याने दहावीनंतरचे शिक्षण पूर्ण केले. स्थिरता आली की युवक नकळत आपल्या कलेकडे वळतो तसे काहीसे आशिषचे झाले खेळ, साहित्य, कला या तिन्हीही क्षेत्रात त्याने स्वत:हाला आजमावून पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्याला कवितेत रमणे महत्वाचे वाटले. शालेय जीवनात क्रीडाक्षेत्रात दाखविलेल्या कौशल्याच्या बळावर क्रिकेट क्षेत्राचीही दारे त्याने ठोठावली. पण प्राथमिक भेटीत क्रिकेटला आवश्यक असे साहित्य त्याच्याकडे नाही म्हणताना त्याला प्रवेश नाकारला होता.
क्रिकेटइतकीच त्याच्या अंतरंगात वक्तृत्व, काव्यलेखन, गीत गायन या कलांचा समावेश होता. शालेय मुलांनी शालेय स्पर्धेमध्ये जी गुणवत्ता दाखवायला हवी ती आशिषने दाखवली होती. उत्स्फूर्त काव्य ही त्याची खासियत होती. गणपती, जत्रा, होळी यासारख्या उत्सवांसाठी तो गावाला गेला की, मालवणच्या निसर्गात तो अधिक रमायचा.
विस्तीर्ण अशी हिरवाई, आकाशाची विशाल निळाई आणि नजरेत मावणार नाही असे गहिरे पाणी त्याला कविता करण्यासाठी प्रवृत्त करायचे. किर्तन, अभंग, प्रवचन हे सातत्याने ऐकल्यामुळे शब्दांचे भंडारही त्याच्याकडे प्रचंड होते. निसर्गाबरोबर अध्यात्म अशी काव्याची वेगळी शैली त्याच्या सादरीकरणात पहायला मिळत होती. निसर्गराजा हा त्याचा काव्यसंग्रह नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या हस्ते प्रकाशित झालेला आहे.
विविध संघटना, संस्थेच्या वतीने जी काव्य संमेलने घेतली जातात त्यात आशिषने आवर्जून भाग घेतला आहे. पुण्याच्या संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी एक विषय घेऊन कवितासंग्रह प्रकाशित केला जातो. त्यासाठी महाराष्ट्रातल्या नवकवींना निमंत्रित केले जाते. प्रेमगंध या काव्यसंग्रहासाठी आशिषच्या `वेदना’ या कवितेची निवड करण्यात आलेली आहे. एखाद्या क्षेत्रात योगदान दिल्यानंतर काही वर्षे ही घालवावी लागतात आणि त्यानंतर ख-या अर्थाने मानसन्मान वाटयाला येतो. रसिक प्रेक्षक दखल घ्यायला लागतात.
आशिषचे मात्र तसे झाले नाही. अल्पप्रयत्नातच त्याच्या कामाचे कौतुक झालेले आहे. आध्यात्मिक चिंतन हा त्याचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. जिथे प्रवचन, किर्तन यानिमित्ताने श्रध्देने माणस एकत्र येतात तिथे या काव्यसंग्रहाचे कौतुक झालेले आहे. अनेक संघटना, संस्थांनी प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन आशिषला प्रोत्साहन दिलेले आहे.
ब्लाईंड असोसिएशन, वृध्द सेवा संघ, मुंबई नागरिक समिती, कृषणा सामाजिक संस्था, महाराष्ट्र मंडळ, निर्भय नागरिक सेवा, श्री आधार केंद्र, साई सेवा संस्था या संस्थांचा यात सहभाग आहे. आशिषची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे आपल्यातल्या काव्याला जपताना सामाजिक कार्यालासुध्दा त्याने तेवढेच महत्त्व दिलेले आहे. ज्या संस्थांनी त्याला पुरस्कार दिलेले आहेत त्या संस्थेत एक कार्यकर्ता या नात्याने राबण्यात त्याने पुढाकार घेतलेला आहे.
रोजचा रेल्वेचा प्रवास, सान्निध्यात येणारी माणसे, मुंबईची वर्दळ त्याने जवळून न्याहाळलेली आहे. त्यामुळे अध्यातमाद्वारे इलाज हा त्याचा चिंतनाचा विषय झालेला आहे. काव्यातून तो ते मांडणार आहे पण पुस्तकरूपानेसुध्दा प्रकाशित करण्याचा त्याने निर्णय घेतलेला आहे. आजच्या ताणतणावाच्या वातावरणात अध्यात्म माणसाला जगवते यावर त्याची प्रचंड श्रध्दा आहे.
आशिष आजगांवकर - ९९६९०२७४०० |