किरण येले, प्रधान कार्यालय - (परिचय) Print E-mail
यांच्या द्वारा - प्रसाद साखरकर   

Baichya Kavita by Kiran Yele

चिल्लरांचे भावविश्व रेखाटणारा बंदा - किरण येले


altभांडुपच्या झोपडपट्टीत बालपण गेलेल्या किरणला कबीर, खलील जिब्रान, गालिब, पाब्लो नेरूदा यांच्या विचारांनी पुरतं झपाटून टाकलं. त्यातूनच तोही समाजात ‘चिल्लर’ समजल्या जाणाऱ्या माणसांचं अंतरंग शब्दबद्ध करू लागला..

प्रचलित समाजव्यवस्था ज्यांची कधी साधी दखलही घेत नाही, अशांच्या जगण्याचा शोध घेऊन त्यांना शब्दरूप देणे, हे किरण येलेच्या साहित्यनिर्मितीचे मूळ प्रेरणास्रोत आहे. शाळा-कॉलेजमध्ये असताना मला कुणी पुढे तू कवी किंवा लेखक होशील, असे सांगितले असते तर तो माझी टर उडवितोय, असे समजून मी त्याला मारलेही असते, अशी कबुलीही तो देतो. कारण भांडुपच्या झोपडपट्टीत बालपण गेलेल्या किरणला हाणामारी काही नवी नव्हती. ती त्या सर्वच वस्तीच्या जगण्याचा अविभाज्य भाग होती.

किरण म्हणतो, भल्या पहाटे नाक्यावरील सार्वजनिक नळावर पाण्यावरून बायकांची भांडणे व्हायची. अगदी एकमेकांच्या अंगावर धावून जाईपर्यंत त्यांची मजल जायची. मग रेशनिंगच्या रांगेत, उधारी लिहिणारा वाणी अशा अनेकांसोबत हुज्जत घालत जगणारी माणसं अवतीभोवती होती. मात्र ज्या बाईला सकाळी शिवीगाळ केली, तिच्यावर काही प्रसंग गुदरला तर चटकन मदतीला धावून तिचे अश्रू पुसण्याची माणुसकीही त्याने तिथे पाहिली.

भांडुपच्या त्या शिवाजीनगर झोपडपट्टीत असताना किरणने फारसे काही लिहिले नसले, तरी त्याच्या लेखनप्रेरणेची मुळे तेथील वास्तव्यातच आहेत, असे तो म्हणतो. त्याच झोपडपट्टीत एका भाईचा म्होरक्या म्हणून विरुद्ध टोळीच्या एका मुलामागे तलवार घेऊन केलेला पाठलाग किरणच्या ठळकपणे लक्षात आहे. धावता धावता रस्त्यात पाय घसरल्यामुळे तो पडला आणि किरण आणि त्याच्या मित्रांनी गाठले. तेव्हा हातात तलवारी घेतलेल्या आम्हा चौघांना पाहून त्याने अक्षरश: देवापुढे घ्यावी अशी लोळण घेतली. त्याच्या त्या भेदरलेल्या डोळ्यांत आपण आयुष्यातले पहिले पुस्तक वाचले, असे तो सांगतो. किरणच्या सांगण्यावरून त्या मुलास जीवदान मिळाले.

गोदरेजमध्ये नोकरी करणाऱ्या चाळीतील बब्यामुळे त्याला वाचनाची आवड लागली. कथा, कादंबऱ्या आणि कविता वाचता वाचता स्वत:ला सुचलेलेही तो डायरीत लिहू लागला. अर्थात हे स्वरचित त्याने कधीच कुणाला त्या वेळी दाखविले नाही. काहीसा हूड असला तरी किरण अभ्यासात अगदीच मागे नव्हता. चेंबूरच्या आचार्य कॉलेजमधून त्याने आधी बी.कॉम. आणि मग मराठी विषय घेऊन एम.ए. केले. त्यांच्या टोळक्यात देवधर्म पाळणारा सुब्रमण्यम् नावाचा एक देवभोळा मित्र होता. अभ्यासातही तो हुशार होता. त्याच्या धर्मविषयक ज्ञानावर मात करता यावी म्हणून किरणने ग्रंथालयातून त्या विषयाची काही पुस्तके शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याच्या हाती कबीराचे पुस्तक आले. कबीराचे विचार वाचून तो हबकूनच गेला. जगण्याविषयी, धर्माविषयी सहज आणि नेमकेपणे लिहिणारा कबीर त्याला खूपच ग्रेट वाटला. नंतर त्याने गीता, बायबल, कुराण हे धर्मग्रंथ वाचले, मात्र त्याला कबीरच थोर वाटला. मग या वाचनप्रवासात खलील जिब्रान, गालिब भेटला. गालिबने माझा एक डोळा उघडला आणि दुसरा पाब्लो नेरूदाने, असे तो सांगतो.

किरणने आजवर विविध ठिकाणी १३ नोकऱ्या केल्या. अगदी रेडलाइट एरियापासून थापाभाईच्या मुलांसोबत फिरण्यापर्यंत विविध प्रकारची कामे त्याने केली. सात रुपये रोजीवर त्याने बिगारी काम केले. मध्येच कबड्डीसारख्या रांगडय़ा खेळात रमून तो राज्य तसेच भारतीय स्तरावरही खेळला. सेल्समन बनून दुकानांमधून ऑर्डर घेत फिरला. या साऱ्या प्रवासात पुस्तकांबरोबरच माणसं वाचायचीही त्याला सवय लागली. कुणाच्याही खिजगणतीत नसलेली माणसं पाहताना आपण लिहिलेले काही या लोकांनी वाचावे असे आपल्याला वाटत असेल, तर आधी आपल्याला या लोकांचे जगणे वाचता आले पाहिजे, असे त्याला वाटू लागले. फुटपाथवर रात्री उशिरा झोपणाऱ्या मुलाला आवडेल, आपली वाटेल, त्याच्या मनाला उभारी देईल, अशी एखादी तरी ओळ आपण लिहावी, असे त्याला पूर्वी आणि आताही वाटते.  

अशाच विचारातून बरेवाईट सुचून डायरीत नोंदविल्या गेलेल्या किरणच्या रचना २००० मध्ये कुसुमाकर प्रकाशनाने ‘चौथ्यांच्या कविता’ या नावाने प्रकाशित केल्या. ‘चौथ्यांच्या कविता’ म्हणजे क्लास फोरच्या कविता. एका नवोदित कवीचा कविता काव्यसंग्रह श्याम पेंढारी यांनी स्वखर्चाने प्रकाशित केला. किरणचा हा काव्यसंग्रह ‘शकुन’ या टोपणनावाने प्रकाशित झाला. टोपणनाव घेण्यामागे किरणची एक निश्चित भूमिका होती आणि प्रकाशन समारंभात त्याने ती सूत्रसंचालकास वाचावयास दिली होती. काव्यसंग्रह प्रकाशित होत असताना किरण श्रोत्यांमध्ये सरबत वाटत होता.

माझ्या कवितेत जर काही ठोस असेल, तर मी रुजेन, नाही तर पहिल्याच संग्रहात बाद होईन, असे किरणचे याबाबत मत होते. किरण या सत्त्वपरीक्षेत उत्तीर्ण झाला. टोपणनावाने लिहिलेल्या या कवितांनीच त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. या संग्रहातील ‘आम्ही चिल्लर सुटे पैसे’ या कवितेला भरपूर प्रतिसाद मिळाला. हिंदी, पंजाबी, मल्याळम् आणि इंग्रजी भाषेत ही कविता अनुवादित झाली आहे. याच काव्यसंग्रहातील कावळा, अ‍ॅसिडिटी आणि कविता, साक्षरता प्रमाण आणि स्टॅण्डर्ड ऑफ लिव्हिंग या कविता भोपाळहून निघणाऱ्या हिंदी अंकामधून प्रसिद्ध झाल्या आहेत.

सदाअत मंटोच्या कथांचा किरणवर भलताच प्रभाव पडला. त्याच्या दोन कथांवर आधारित त्याने ‘जल गयी पतंगे’ हे दोन अंकी नाटक लिहिले. राज्य नाटय़ स्पर्धेत ठाणे जिल्ह्य़ातून हे नाटक प्रथम आले आणि अंतिम फेरीत उत्कृष्ट संहिता म्हणून त्याचा गौरव झाला. विविध कारणांनी देशभरातून मुंबईत पळून येऊन प्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या मुलांच्या भावविश्वाविषयी त्याने ‘प्लॅटफॉर्म नं. ९’ हे नाटक लिहिले. झी मराठी वाहिनीवरील ‘शुभंकरोती’ या मालिकेच्या निमित्ताने पटकथा लेखनाचे तंत्र शिकता आले, असे तो सांगतो.

काहीही झाले तरी केवळ प्रसिद्धीसाठी लिहायचे नाही, हा नियम किरणने कटाक्षाने पाळला आहे. आतून आल्याशिवाय, स्वत:चे पूर्णपणे समाधान झाल्यशिवाय,  मग ती कथा असो वा कविता, तिला अंतिम स्वरूप द्यायचे नाही, हे त्याचे धोरण आहे. त्यामुळे वर्षभरात जेमतेम दोन किंवा तीनच कथा लिहून होतात, पण त्या पूर्णपणे समाधान देणाऱ्या असतात, असे तो म्हणतो. हल्ली काही मान्यवर दिवाळी अंकांमधून किरण येलेच्या कथा आणि कविता दिसत असल्या तरी दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध व्हावे, यासाठी मी काहीही लिहीत नाही, असे तो आवर्जून सांगतो.

गेल्या डिसेंबरमध्ये त्याचा ‘बाईच्या कविता’ हा काव्यसंग्रह ग्रंथालीने प्रकाशित केला. या कवितांची सर्वच स्तरांवर दखल घेतली गेली. या काव्यसंग्रहाचा मल्याळम् आणि हिंदी अनुवाद लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ज्येष्ठ कविवर्य शंकर वैद्य यांनी प्रत्येक स्त्री-पुरुषाने वाचावे असे हे स्त्री-स्तोत्रच आहे, अशा शब्दांत या काव्यसंग्रहाची स्तुती केली आहे. मे महिन्यात ‘ललित लक्षवेधी’ ठरलेल्या या काव्यसंग्रहास यंदा इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिराच्या वतीने दिला जाणारा सुजाता पाब्रेकर स्मृती पुरस्कार मिळाला आहे.

‘बाई नख वाढवते आणि आयुष्यभर रंगवत राहते’

किंवा-

‘बाईला कितीही वाटलं तरी
तिच्या स्क्रीनवर
नवरा वा मुलांशिवाय
ती कुणाचाही फोटो सेव्ह करीत नाही.’

अशा प्रकारच्या या काव्यसंग्रहातील अनेक ओळी लक्षात राहतात. स्वत:च्या या कवितांना तो कोणतेही लेबल लावू इच्छित नाही. कविता साठोत्तरी आहे की नव्वदोत्तरी याचा विचार तो फारसा करीत नाही. तो विचार समीक्षकांनी करावा, असे त्याचे मत आहे. जुनी असो वा नवी, जगण्याचा थेट संदर्भ असणारी कविता आपल्याला आवडते, असे तो म्हणतो.

आता दोन काव्यसंग्रहांनंतर गेल्या दहा वर्षांत विविध दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेल्या कथांचा संग्रह करण्याचा त्याचा विचार आहे. १३ ठिकाणी नोकऱ्या केल्यानंतर आता न्यू इंडिया इन्श्यूरन्समध्ये प्रशासन अधिकारी असणाऱ्या किरणने १४ वर्षांपूर्वी भांडुप सोडले. आता तो अंबरनाथला राहतो. नोकरी सांभाळून लेखन, वाचन आणि सामाजिक कार्य अशा तिन्ही आवडत्या गोष्टींमध्ये त्याने स्वत:ला रमविले आहे. राहण्याची जागा आणि नोकरीचे ठिकाण बदलले असले, तरी एरवी चिल्लर वाटणाऱ्यांविषयी नेमकेपणे आणि आस्थेने लिहिण्याचा घेतला वसा तो कसोशीने पाळत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

किरण येले ९८६९ २६० ७८०

Poet, short story writer, playwright.

पुरस्कार :





यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार

तरूण भारतीय साहित्य मित्र पुरस्कार

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा २००७चा `उत्कृष्ट नाट्यसंहिता’ पुरस्कार.




नाट्य :



जल गई पतंगे

...

`सआदत हसन मंटो’ च्या दोन कथांवर आधारीत दोन अंकी नाटक


...

४७ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत प्राथमिक फेरीत ५ व अंतिम

फेरीत ४, असे एकुण ९ पुरस्कार.


...

ठाणे जिल्ह्यात `प्रथम’


...

`उत्कृष्ट संहिता’ चा महाराष्ट्र राज्य पुरस्कार




प्लँफॉर्म नं.

...

४९ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत ठाणे जिल्ह्यात दुसरे

शुभंकरोति

...

`झी मराठी’ या वाहिनीवरील `शुभंकरोति’ या मालिकेत पटकथा व संवादलेखन


...

दिग्दर्शक  संगीत कुलकर्णी


...

कलाकार  अरून नलावडे, राजन भिसे, आनंद अभ्यंकर, अतुल परचुरे, प्रिया बापट, अविनाश नारकर, इला भाटे, उमेश कामत, अद्वैत दादरकर, वैभव मांगले,

संहिता व गीत लेखन






प्रेम कर

...

नारायणी म्युझिक कॉर्पोरेशन


...

संहिता : किरण येले           गायक : संजय गीते


...

निवेदक `डोंबिवली फास्ट’ फेम सिनेकलाकार संदीप कुलकर्णी.

कोसा तुम्हे लाखो बार (नाटक) मेघना पेठे यांच्या कथांवर आधारित २ अंकी हिंदी

नाटकात भारूड व गीतलेखन

महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेत २००७ प्रथम पुरस्काराने

सन्मानित.


दूरदर्शन व आकाशवाणी




....

ई टीव्ही मराठी



`घर कवितांचे’ या कार्यक्रमात दोन भागात कविता सादरीकरण


....

ई टीव्ही मराठी



२००७ साली सादर झालेल्या `साहित्य दरबार’ या कार्यक्रमात ४ भागात कविता सादरीकरण


....

आकाशवाणी



कविता सादरीकरण,



कथा वाचन



प्रादेशिक कवितांचे अनुवाद २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त होणा-या राष्ट्रीय कविता संमेलनातील प्रादेशिक कवितांचे अनुवाद करून त्यांचे सादरीकरण.





....

कथा लेखन



... लघु कथा लेखन हंस, किस्त्रीम, कदंव, दर्शन, नवअनुष्टुभ,इ.

दिवाळी अंक, नायतकालीक व अनियतकालिकांतून

प्रकाशित

... `गॉयटर’ या कथेवर आधारित एकांकिकेचे पृथ्वी थिएटर

आयोजित कार्यक्रमात धवल ग्रुप द्वारा सादरीकरण




पुस्तक परिचय व स्तंभलेखन





दैनिक सकाळ

... रविवारच्या साहित्य पुरवणीत स्तंभलेखन साल २००५

रविवारच्या साहित्य पुरवणीत पुस्तक परिचय साल २००२.






दैनिक सांज तरूण भारत

... गुरूवारच्या साहित्य पुरवणीत स्तंभलेखन साल २००३.






कविता



चौथ्यांच्या कविता

... सन २००० मध्ये कवित संग्रह प्रकाशित

... आवृत्ती अनुपलब्ध

... काही कवितांचे अनुवाद महाराष्ट्राबाहेर इतर प्रादेशिक भाषांत इंडियन जर्नल ऑफ पोस्ट कोलोनियल लिटरेचर (इंग्रजी, केरळ), कविता (मलयाळम, केरळ), साहित्य संगमम (मलयाळम, केरळ), नगर कविता (मलयाळम, केरळ), भाषापोषिणी (मलयाळम, केरळ), काव्यलोक (पंजबी, लुधियाना), साक्षात्कार (हिंदी, भोपाळ, मध्य प्रदेश), वागर्थ (कोलकता) .






... मूसइंडिया डॉट कॉम या इंटरनेट वरील साहित्य विषयक (जानेवारी फेब्रूवारी २००८) अंकात कविता न परिचय प्रसिध्द

... कविताकोश डॉट ओआरजी या हिंदी साईट वर व मायबोली डॉट कॉम वर कविता प्रकाशित.

Kiran yele,

9869260780

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it




 
Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates