|
‘महा (न)वितरण’चे महासौजन्य
(स्थळ : महावितरणचे कोणतेही कार्यालय. वेळ- लोडशेडिंगची. साहेब पंख्याखाली झोपलेले आहेत. त्रस्त सामान्य ग्राहक प्रवेश करतो.)
ग्राहक : साहेब, आता तरी जागे व्हा. संपूर्ण महाराष्ट्र अंधारात असताना तुम्हाला ऑफिसमध्ये झोप लागतेच कशी? साहेब : कोण? कोण तुम्ही? सामान्य ग्राहक काय! मला वाटलं, कोणी राजकीय पुढारीच आले वाटतं. तुम्हाला विजेची गरजच काय? तुम्ही एसीशिवाय झोपू शकता. तुम्हाला महत्त्वाचे कॉल येत नसल्याने मोबाइलचे चार्जिग नसले तरीही चालते. महागाईमुळे तुम्हाला वाटपाचे जेवण परवडत नाही, त्यामुळे मग मिक्सरही रिकामाच. पोटापाण्यासाठी वणवण भटकताना घरी टी.व्ही. बघायला तुम्हाला वेळ नाही. मग तुम्हाला विजेची गरज काय?
ग्राहक : (चाचरत) तरीही ग्राहकांसाठी काही सौजन्य..
साहेब : म्हणूनच महाराष्ट्र मागे! अहो, तुम्ही ते ‘आयुष्याच्या पेटवा मशाली’ की काय ते गाणं ऐकलं नाही का? मग मशाल पेटवा आणि पुढे चला. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या वेळी काय वीज होती? तरीही ते डगमगले नाहीत. आणि तुम्ही जरा काही झाले की आलेत धावत!
ग्राहक : पण साहेब, माझी तक्रार वेगळी आहे. माझ्या घरात वीज जोडणी नसतानाही मला ५००० रुपये बिल आलंय.
साहेब : दोन पर्याय आहेत. एक- बिल भरून टाका किंवा २००० रुपये द्या.
ग्राहक : पैसे? कशासाठी?
साहेब : अहो, आमचा वायरमन तुमच्या घरी येणार, त्याला काही पेट्रोल, चहापाणी लागत नाही? आणि तुम्ही माझ्या वेळेचा अपव्यय केलात त्याची किंमत नको?
ग्राहक : पण सरकार तुम्हाला पगार देते..
साहेब : तो घर चालवायला! चहापाणी, तबांखूचे काय? म्हणूनच आम्ही सामान्य ग्राहकांच्या नादी लागत नाही.
अमित सामंत - लोकसत्ता
|