गाडगीळ आजोबा Print E-mail
यांच्या द्वारा - शिरीष कणेकर   

शेवटी दार उघडून मी त्यांच्या मागे मारायला धावलो. ती सैरावैरा पळत सुटली. पळता पळता एक कार्टं म्हणालं, ‘‘बुढ्ढा खिसक गया है. हम खेलते है तो इसके बापका क्या जाता है?...

पुण्यात आमच्या पिल्ले वाड्यासमोर गाडगीळांचा वाडा होता. आम्ही भाडेकरू होतो. गाडगीळ वाड्याचे मालक होते. दुपारी गल्लीत आमचं धमासान क्रिकेट चालायचं. प्रचंड आरडाओरडा व गिलका हा आम्ही क्रिकेटचाच भाग समजायचो. गाडगीळ आजोबा तिरीमिरीत बाल्कनीत यायचे आणि ओरडायचे, ‘‘इथे खेळू नका. तुमच्या घरी खेळा.’’

घरी कसं खेळणार? क्रिकेट काय घरात खेळतात? मग हजारे आणि मंकड मैदानावर का खेळतात? आम्हाला मैदान नाही म्हणून आम्ही गल्लीत खेळतो.

मोहन बरोबर म्हणाला होता. ‘यांच्या बापाचं काय जातं?’

मला हसू आलं. गाडगीळ आजोबांचा बाप? तो किती वर्षांचा असेल? असला तरी शिवाजीच्या वयाचा असेल.

माझी आयडिया मी मोहन, सदू, वामन्या, चंदू व बाबू यांना सांगितली. त्यांना येड्यांना काही कळलंच नाही. याला जोक म्हणतात हे सांगूनही कळलं नाही.

ते म्हणाले, ‘‘आयला, गाडगीळ आजोबांचा बाप शिवाजीएवढा असेल? सॉलीड ना! शिवाजीने अफझलखानाचा कोथळा कसा काढला त्याला विचारू या.’’

हे असे माझे मावळे. शिवाजीबरोबर राहुटीत तेव्हा फक्त त्याचा ‘बॉडीगार्ड’ जिवा महाला होता. तिथे कोणी गाडगीळ असल्याचं ऐकलं नव्हतं. पण असेलही आणि तो कातावून ओरडला असेल, ‘इथे मारामारी करू नका. घरी जाऊन करा.’
काय घरी जाऊन करा? शिवाजीदेखील संतापला असेल व अफझलखानाच्या आधी त्याने गाडगीळ आजोबांच्या बापाच्या पोटात वाघनखं खुपसली असतील.

मी ही आयडिया आमच्या गँगला सांगितली नाही. ते गाडगीळांच्या वाड्यावर वाघनखं पाहायला गेले असते व गाडगीळ आजोबांनी त्यांचाच कोथळा काढला असता.

सवतीचं पोर खुपावं त्याप्रमाणे गाडगीळ आजोबांना आमचं दुपारचं क्रिकेट का खुपायचं आम्हाला कधीच कळलं नाही. वर गप निवांत झोपायला काय झालं होतं? जरा खेळ रंगात आला की आलेच गाडगीळ आजोबा तणतणत. आम्ही त्यांना दुरुत्तर करीत नसू, पण त्यांच्या बोलण्याकडे लक्षही देत नसू. आम्ही खाली व गाडगीळ आजोबा वर. एकाच वेळी ओरडायचो. आम्हाला डिस्टर्ब व्हायचं.

बाबूने यावर एकदा तोडगा सुचवला. ‘‘आपण गाडगीळ आजोबांनाच खेळायला बोलावलं तर?’’

‘‘पण ते धावू शकणार नाहीत.’’ - सदू.

‘‘त्यांना विकेटकीपर ठेवायचं.’’ - वामन्या.

‘‘बॅटिंगला पण त्यांना रनर द्यावा लागेल.’’ - चंदू.

‘‘त्यांना अंपायर केलं तर?’’ - मी.

‘‘ते अंपायर व्हायला तयार झाले पाहिजेत. वामन्या कधीच अंपायर व्हायला तयार नसतो.’’ - मोहन.

शेवटी गाडगीळ आजोबांना भेटून ही ऑफर कोणी व कशी द्यायची या मुद्यावरून बोलणी फिसकटली.

यथावकाश शाळेच्या सुट्ट्या संपल्या. दुपारचं क्रिकेट थांबलं, पुणे सुटलं, गाडगीळ आजोबाही गेले.

परवा दुपारी निवांत झोपलेलो असताना बाहेर कॉरीडॉरमध्ये व्रात्य पोरं क्रिकेट खेळत होती, पण आरडाओरडा करायचं काय कारण होतं? डोकं फिरलं. सांगून ऐकायचं नाव नाही. शेवटी दार उघडून मी त्यांच्या मागे मारायला धावलो. ती सैरावैरा पळत सुटली. पळता पळता एक कार्टं म्हणालं, ‘‘बुढ्ढा खिसक गया है. हम खेलते है तो इसके बापका क्या जाता है?...

 

शिरीष कणेकर

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आभार : सामना वर्तमानपत्र

 
Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates