तरळतात माझ्या खिडकीबाहेरी, पानं गळणारी शिशिरातली, लाल सोनेरी येते सय तुझ्या ओठांची आणि वसंतातल्या चुंबनांची हात तुझे उन्हात ताम्बुसलेले आश्वस्त माझ्या हाती गुंफलेले तू गेल्यापासून रेंगाळतात दिवस लांबच लांब आणि आता पडतील कानी हिवाळ्यातली तीच गाणी जुनी पुराणी तू गेल्यापासून विरहाने मन जात आहे गहिवरून पण प्रिय, होते सारेच असह्य हृदय भारी जेव्हा तरळू लागतात माझ्या खिडकीबाहेर तांबूस सोनेरी पाने
मित्रा, यूटय़ूबवर जाऊन या गाण्याचे मूळ इंग्रजी शब्द autumn leaves are falling लिही.. म्हणजे काही क्षणांत गाणे पाहता-ऐकता येईल. गाण्याचा व्हीडिओदेखील कमालीचा देखणा आहे. या गाण्याबद्दल बोलावे तितके थोडे! कविता नीट वाचलीस तर लक्ष्यात येईल की कवीचे दु:ख तरल आहे.. तो विव्हळत नाहीये. प्रेयसीच्या आलेल्या आठवणीत फक्त मग्न आहे.
‘मौसम’ मधल्या गुलजारजींच्या ‘दिल ढूंढता है फुरसतके रात दिन..’ सारखा कवीचा मूड आहे. प्रिय व्यक्तीच्या वेगवेगळ्या ऋतूंमधल्या सहवासाची आठवण यावी आणि त्या मीठय़ा दर्दमध्ये आपण हरवून जावे, तसा अनुभव हे गाणे ऐकताना येतो.
तिच्या विरहाची वेदना तो भोगतो आहे. पण कशी? शिशिरातली पानगळ पाहून उन्हाने तांबुसलेल्या तिच्या हाताच्या स्पर्श त्याला आठवतो. त्याच्या एकटेपणात तिची आठवण त्याला सोबत करते आहे . त्या दुखात डिग्निटी आहे.
हे डिग्निटी असलेलं दु:ख आपल्या मराठी कवितांमध्ये शोधताना पुन्हा सापडतात शिशिर ऋतूत गळणारी पानं.. बा. सी. मर्ढेकरांची ‘शिशिर्तुच्या पुनरागमे’ ही कविता, दुरावलेल्या प्रियेच्या बागेत ‘बकुलावली’ फुलली असल्याचं पाहते आणि ‘इवली सुकोमल पाखरे’ कुठे जाणार, असा प्रश्नही तिला विचारते. पण ही ‘कविता’ आहे, आणि ऑटम लीव्ह्ज् हे गाणं! अशा उत्कट तरीही संयत अविष्कारामुळे मनमोराचा पिसारा फुलतो..
डॉ. राजेंद्र बर्वे - लोकसत्ता
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it