नवरा पाहू गेले, काय पाहता वतन...पाहा गुणाचा रतन Print E-mail
यांच्या द्वारा - आभार : अरुणा ढेरे, लोकसत्ता   


शहाणी होईल बबी माझी! मोठी मोठी बुकं वाचील! अन् मग महाराज, छोनीचं आमच्या लगीन! - खरंच सोने, नवरा काळा हवा की गोरा? काऽळा? नको गं बाई! छबीला माझ्या कसा नक्षत्रासारखा, अगदी चित्रासारखा नवरा मिळेल हो!..

मी- वय वर्षे दहा- इयत्ता चौथी. साडीबिडी नेसून, बाहुलीला मांडीवर घेऊन दिवाकरांची ती झकास नाटय़छटा ठसक्यात सादर केलेली मला आजही आठवते. चिंगी महिन्याची झाली नाही तोच!या नावाची ती नाटय़छटा अतुल पेठेनं दिग्दर्शित केलेल्या दिवाकरांवरच्या रंगमंचीय प्रयोगात अलीकडे पुन्हा पाहिली-ऐकली, आणि काय काय मनात येत राहिलं.

एक महिन्याची तान्ही चिंगी- एवढीशी! पण तिच्या भाबडय़ा आईचे मनसुबे आपल्या लेकीच्या लग्नापर्यंत- नव्हे बाळंतपणापर्यंत जाऊन पोचणारे. त्या मजेदार विसंगतीची जाणीव मला तेव्हा नाही, पण पुढे दहा-पंधरा वर्षांनी कधीतरी झाली होती. मग दिवस जात गेले तशा आणखी ब-याच गोष्टी लक्षात येत गेल्या.

दिवाकरांच्या नाटय़छटा प्रथम प्रसिद्ध झाल्या १९३३ मध्ये. त्याआधी कधीतरी त्यांनी चिंगीच्या आईची कल्पना करून ही नाटय़छटा लिहिली असणार. तो सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीचा काळ. त्यावेळच्या घराघरातल्या सर्वसामान्य बायकांमधलीच एक चिंगीची आई. मुलीला काळा नवरा नको, नक्षत्रासारखा सुंदर आणि गोरा हवा, असं म्हणणारी. तिनं मोठी मोठी बुकं वाचली तरी ऐश्वर्यवंत, भलंथोरलं घरदार, दागदागिने असं सगळं मिळून तिचा संसार थाटाचा होण्यातच तिचं भाग्य आहे, असं मानणारी. तिला पुढे मुली होऊ नयेत, सगळे मुलगेच व्हावेत, अशी इच्छा करणारी.

अशी आई तर बायकांच्या जात्यावरच्या ओव्यांमध्येही भेटली आहे..

मैनाला मागनं, काय मागन्याची तबा

संग दागिन्याचा डबा

 

लाडाची गं लेक द्यावी सातार प्रांतीला

हत्ती घोडं वरातीला

 

ज्याच्या घरी गाडीघोडं, जिथं हाय कुनबीन

तिथं द्यायाची पदमिन

 

गादीशी बसणार, हिरव्या मंदिली तुरा खोवी

माजी मैना त्याला द्यावी

कशी वैभवाची, सत्तेची, आबादानीची स्वप्नं पाहते आहे लेकीची आई! कधी कधी एखादी शहाणीसुरती, संवेदनशील आई नव-याला विनवते आणि घरादारापेक्षा मुलाची नीट पारख करून, त्याच्या शील-गुणांचा विचार करून तिथं सोयरिक करण्याचा आग्रह धरते.

 

नवरा पाहू गेले, काय पाहता वतन

पाहा गुणाचा रतन

मुलीला सुखी पाहायचं असेल तर तिला साजेसा गुणी नवरा पाहा, असं एखादी माऊली नव-याला सांगू पाहते. पण तिचं म्हणणं मानायचं की नाही, हे ठरवणं घरधन्याच्या मर्जीवर अवलंबून. आपण मुलीचं अकल्याण करत नाही, अशा खात्रीनं मुलीचं लग्न आई-बाप ठरवून टाकत असत, ही वस्तुस्थिती गेल्या पंचवीस-तीस वर्षांपूर्वीपर्यंत होतीच. मुलीचं लग्न हा बापाच्या किंवा भावांच्या सत्ताकारणाचा, राजकारणाचा किंवा अर्थकारणाचा एक भाग असायचा, हा इतिहास काही फार जुना नव्हे. आणि लुळा-पांगळा, वेडाबागडा, विधुर किंवा म्हातारा- कसाही असो, लेकीसाठी एक नवरा शोधून तिचं लग्न करून द्यायचं, ही परिस्थितीनं गांजलेल्या आई-बापांची जीवनावश्यक गरज असायची, ही वस्तुस्थितीही फार दुर्मिळ नव्हे.

एकूण लग्न या गोष्टीशी मुलीच्या (आणि खरं तर मुलाच्याही) मताचा, मनाचा काही संबंध नव्हता. शिवाय कितीएक शतकं मुलीच्या लग्नाचं वय कमी करत करत अगदी पाळण्यापर्यंत आणून ठेवलंच होतं समाजानं. तिला लग्नया शब्दाचा अर्थ समजत नव्हता किंवा लग्नहा शब्द उच्चारताही येत नव्हता, त्या लहानगीला लग्नाबद्दल मत कसं असणार? पण काळ बदलला. आठ-दहा वर्षांपूर्वी आमच्या घरासमोर राहणारी एक सात-आठ वर्षांची लहान मुलगी अबोली मला गाणं म्हणून दाखवायला लागली तेव्हा तो बदल जाणवून आनंदाचं आणि मौजेचं हसूही आलं.

माझ्या आत्याची आली तार, ती मला सून करणार!

असं ते गाणं खरंच फार मजेदार होतं. पूर्वी मामाच्या मुलीशी लग्न करण्याची प्रथा होती. त्या गाण्यातल्या आत्यानं भाचीला सून म्हणून पसंत करून ठेवलेलं असणार. पण भाचीला आता थोडं कळू लागलेलं आहे. ती विचार करते आहे- आत्याच्या मुलाचा. त्याचं रूप, त्याचे गुण, त्याची बुद्धिमत्ता ती पारखते आहे.

आत्याचा मुलगा काळा

तो आहे डांबराचा गोळा

 

आत्याचा मुलगा हिरो

पण पेपरात पडतो झिरो

 

आत्याचा मुलगा वसंत

पण मला बाई तो नाही पसंत..

काहीच नाही त्या मुलामध्ये मनाजोगतं. रूप तर नाहीच, पण रूपाचा विचार बाजूला ठेवला तर चारित्र्य आणि बुद्धिमत्ताही नाही. परीक्षेत नापासच होतो आहे तो- तरी हिरोगिरी करत फिरतो आहे. आणि मुख्य म्हणजे वसंत वगैरे नाव ठीक असलं तरी मला तो पसंत नाही.

आता मुलगी तिच्या पसंतीचा विचार करते आहे. मुलाची पारख स्वत:च्या समजुतीनं, विचारानं करते आहे. आणि पाहा- तिला जे हवं आहे ते तिच्या आई-बापांच्या पूर्वीच्या कल्पनांपेक्षा अगदी वेगळं असू शकतं आहे.

मला नील आर्मस्ट्राँगच्या पत्नीची एक प्रतिक्रिया कुठेतरी वाचलेली आठवते आहे. नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पोचला. त्याच्या रूपानं मानवाचं पहिलं पाऊल चंद्रावर पडलं. सारं जग त्या विलक्षण रोमांचक अनुभवानं थरारून गेलं. नंतर कुणीतरी पत्रकारानं त्याच्या बायकोला विचारलं, ‘नीलनं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. चंद्रावर उतरणारा पृथ्वीवरचा तो पहिला माणूस ठरला. तुझ्या आयुष्यातला हा सगळ्यात अविस्मरणीय क्षण असेल ना?’ आणि ती क्षणार्धात म्हणाली, ‘नाही! नाही!तिचं पुढचं वाक्य फार सुंदर होतं. ती म्हणाली, ‘नाही. माझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय, सर्वात रोमांचकारी क्षण आधीच येऊन गेला आहे. त्याचं आणि माझं लग्न झालं, तो क्षण!

मी त्या उत्तराशी कितींदा उचंबळून येऊन थांबले आहे. त्याची पत्नी होण्याचा तो क्षण तिच्या आयुष्यातला अधिक अर्थपूर्ण क्षण होता. इतरांसाठी खूप साधी, चारचौघांसारखी चाकोरीतली ती घटना होती खरी, पण तिच्या हवेपणाच्या पारडय़ात तिचं मोल खूप मोठं होतं. तिच्यासाठी तो सार्थकाचा क्षण होता. मुलीला हवं असणारं, तिला मोलाचं वाटणारं, तिचं आयुष्य अर्थपूर्ण करणारं काय असेल, याचा विचार लग्नामध्ये निदान तिच्या कुटुंबाच्या बाजूनं तरी केंद्रस्थानी असायला हवा, याची झणझणती जाणीव करून देणारं ते उत्तर प्रत्यक्षात किती साधं आहे!

निर्मला पुतुल या कवयित्रीची अशीच एक साधी कविता परवा परवा माझे स्नेही गिरीश ओक यांनी माझ्या हाती ठेवली आणि अगदी सहज त्या कवितेनं नील आर्मस्ट्राँगच्या पत्नीच्या प्रतिक्रियेच्या हातात हात गुंफला. आपल्या बापाशी बोलणारी गावाकडची एक लेक आहे त्या कवितेत. ती बापाला सांगते आहे-

बाबा, मुझे उतनी दूर मत ब्याहना

जहाँ मुझसे मिलने आने खातिर

घरकी बकरियाँ बेचनी पडे तुम्हें।

नदीच्या एका घाटावर ती रडत असली तर दुस-या घाटावर अंघोळीला आल्यावर बापाला ऐकू यावा तिचा हुंदका- इतकंच अंतर तिला सासर-माहेरात हवं आहे. तिला हवे आहे भोवती जंगल, नदी, पहाड. रस्त्यांवरून धावणा-या मोटारगाडय़ांऐवजी परसात उभं राहून तिला सूर्यास्त पाहायचा आहे. आणि तिला नवरा नुसता धनवान नको आहे, सतत लाठीकाठीची भाषा करणारा नको आहे, जत्रेत पोरी उडवणारा नको आहे. आयुष्यातल्या साध्या, निर्मळ सुखांचा अर्थ ज्याला समजेल आणि जो तिच्यावर मनापासून प्रेम करेल, असा नवरा तिला हवा आहे.

अशा माणसाच्या हातात माझा हात देऊ नाही

ज्या हातानं कधी एखादं झाडं नाही लावलं,

की शेतातून एखादं पीक काढलं नाही

 

ज्या हातानं कधी कुणाला साथ नाही दिली

की कधी कुणाचं ओझं उचलून हलकं केलं नाही

...

 

असा नवरा शोधा माझ्यासाठी बाबा,

जो वाजवील सुरेल बासरी,

 

ढोल-मांदळ वाजवण्यात जो माहीर असेल

वसंतात आणील माझ्या अंबाडय़ावर माळण्यासाठी

पळसाची लाल फुलं

 

आणि मी उपाशी असेन तर ज्याचा घास अडेल..

या कवितेतल्या पोरीची इच्छा ऐकताना बहुधा बापाचं काळीज असणा-या प्रत्येक वाचकाचा घास अडेल. आणि तसं झालं तर निर्मला पुतुल यांच्या या कविताकन्येचं आयुष्यही सार्थकी लागेल.

 

आभार : अरुणा ढेरे, लोकसत्ता

 
Type in:

आपलं स्वागतRocketTheme Joomla Templates