|

एक माकड फळवाल्याकडे जांभळं गोळा करून देण्याच्या कामाला होते. फळवाला- महादूदादा त्या बदल्यात माकडाला कधी भाजलेल्या शेंगा द्यायचा तर कधी केळी द्यायचा. त्या दिवशी महादूदादाने माकडाला दिली पाच किलोची खमंग ताज्या गुळाची ढेप!
घरी आल्यावर माकडीण आणि त्यांचं एकुलतं एक गोजिरवाणं पिल्लू माँटो गुळाची ढेप बघून खूप खूष झालं. ‘माँटो बाळा, हे पाहिलंस का? गूळ आहे, ताजा ताजा!’ माकड म्हणालं.
‘मला गूळ आवडतो!’ माँटो उडय़ा मारत म्हणाला. ‘उद्या किनई मी गूळ घालून शेवयांची खीर करीन. बेटा माँटो, तुला खीर खूप खूप आवडते ना?’ ‘हो आई! तू कित्ती छान आहेस,’ असं म्हणून माँटोने आईला मिठी मारली.
दुसऱ्या दिवशी जेवणं आटोपल्यावर माकडीण थोडी वामकुक्षी घेत होती. माँटो त्याचा खेळ घेऊन खेळत होता. तो चेंडू आणि बॅट घेऊन क्रिकेट खेळायला लागला. खेळता खेळता चेंडू गेला स्वैपाकघरात आणि तिथे माँटो गेला तर त्याला दिसली गुळाची ढेप! त्याच्या तोंडाला सुटलं पाणी! त्याने थोडासा गूळ खाल्ला, आवडला म्हणून अजून गूळ खाल्ला, असं करत करत त्याने ती अख्खी गुळाची ढेपच खाऊन फस्त केली. मग तो आईजवळ येऊन बसला आणि त्याने पुस्तक वाचायला सुरुवात केली.
थोडय़ाच वेळात आई उठली. माँटो अभ्यास करतोय हे पाहून खुषीत स्वैपाकघरात खीर करायला गेली. तिने शेवया तुपात परतून घेतल्या. त्यात दूध घातले, गॅस मंद करून ती गुळाच्या ढेपीतील गूळ काढायला गेली. पाहते तो काय? गूळ संपून गेलेला! आईमाकडीण बाहेर येऊन म्हणाली, ‘बेटा माँटो, गूळ कुणी खाल्ला?’ बेटा माँटो लागला रडायला! म्हणाला, ‘आई, तू झोपलीस तेव्हा ट्रिंग ट्रिंग बेल वाजली. मी दार उघडलं तर दारातून हत्तीदादा सरळ आत आला. किचनमध्ये गेला, थोडा गूळ खाऊन घरी गेला.’
‘मग उरलेला गूळ कुणी खाल्ला?’ आईने विचारलं. ‘परत ट्रिंग ट्रिंग बेल वाजली. जिराफभाऊ आला, त्याला गूळ खाऊ नकोस, असं सांगायला मी शिडीवर चढत होतो, त्याच्या तोंडासमोर उभं राहून बोलायला शिडीवर चढावंच लागतं ना, तर तो आधीच आत गेला. मान वाकडी करून थोडा गूळ खाल्ला नि निघून गेला,’ माँटोने उत्तर दिले.
‘मग उरलेला गूळ कुणी खाल्ला?’ आईने विचारलं. ‘अगं, पुन्हा बेल वाजली ‘ट्रिंग ट्रिंग’. मी दार उघडलं तर दारात होता उंदीरमामा! टुणकन उडी मारून आत गेला, थोडा गूळ खाऊन पळून गेला,’ माँटो म्हणाला.
‘‘उरलेला गूळ कुणी खाल्ला?’’ आई गालातल्या गालात हसत विचारत होती. ‘‘अगं! परत ‘ट्रिंग ट्रिंग’ बेल वाजली, मी दार उघडलं, तर दारात जंगलचा राजा सिंह आणि महाराणी सिंहीण उभी होती. मी घाबरून दारापाठी लपलो, तर दोघे आत गेले, उरलेला सऽऽगळा गूळ खाल्ला, बाहेर आले, मग त्या एका गोळीच्या जाहिरातीतल्या सिंहाप्रमाणे दोन्ही सिंहांनी कंबर लचकवत नाच केला. सिंहराजाने मला हूल दिली, मी घाबरलो तर सिंहराजाने राणी सिंहिणीच्या पंजावर पंजा मारून टाळी दिली नि ते निघून गेले.’ माँटोने मोठ्ठी कहाणी संपवली.
मग आई काही न बोलता चहा करायला स्वैपाकघरातमध्ये गेली. चहा घेता घेताच माँटो ओरडायला लागला, ‘पोटात दुखतंय, आई ग! खूप दुखतंय!’ मग आईने डॉ. वानरेंना बोलावलं. ते म्हणाले, ‘बघू! अरे बापरे! याच्या पोटात पाच किलो गूळ आहे. काय रे, गूळ खाल्लास एवढा?’
‘हो हो! डॉक्टरकाका! मी आईला खोटं बोललो.’
मग डॉक्टरांनी त्याला एक इंजेक्शन दिलं. ते म्हणाले, ‘बेटा, गूळ खावा, पण थोडासा!’
‘हो डॉक्टरकाका! मी परत एवढा गूळ नाही खाणार, पण तुम्हाला कसं कळलं, मी खूप गूळ खाल्ला ते?’
‘वेडय़ा, तुझ्या आईने मोबाइलवरून सगळं सांगितलं. लक्षात ठेव, आई हुशार असते, तिला फसवता येतच नाही. काय?’ असं म्हणून त्यांनी बॅग घेतली. आईमाकडिणीने फी म्हणून त्यांना सहा केळी दिली. माँटोने आईच्या गळ्याला मिठी मारत म्हटलं, ‘माझी आई, हुश्शार आई!’
प्रियंवदा करंडे - लोकसत्ता
रविवार १० एप्रिल २०११
|