|
मराठी माणूस उद्योग-व्यवसाय करू शकत नाही, मराठी माणसाला मुंबईतून हुसकावून लावण्याचा केला जाणारा प्रयत्न, मराठी माणसाची होणारी कुचंबणा, मराठी माणसाच्या समस्या, मराठी माणसाला नेतृत्व करता येत नाही वगैरे मराठी माणसाचे प्रश्न यावर बरेच बोलले, लिहिले गेले आहे. तसेच त्यावर अलीकडच्या काळात चित्रपटही येऊन गेले आहेत. परंतु, ‘स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटाद्वारे पुन्हा तोच विषय मांडतानाही दिग्दर्शकाने मूळ कथानकाबरोबर ऐतिहासिक कथा सांगण्याचा वेगळा प्रयत्न खरे म्हणजे प्रयोग करण्यात आला आहे.
राम पाठारे (राजेश शृंगारपुरे) हा टिळक नगर वस्तीतल्या चाळीत राहणारा उच्चशिक्षित तरुण व्यवसायासाठी बँकेत कर्ज मागायला जातो. बँकेचा अमराठी व्यवस्थापक (अरुण भडसावळे) कर्ज देण्यासाठी मौल्यवान वस्तु गहाण ठेवायला सांगतो. व्यवसायासाठी कर्ज मराठी माणसाने घेऊ नये असा सल्ला देताना यापूर्वी मराठी लोकांना व्यवसायासाठी कर्ज घेतल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली याचा पाढा राम पठारेसमोर वाचतो.
त्यामुळे वैतागलेला राम पाठारे आपल्या चाळीतील लोकांशी सल्लामसलत करून ‘पाठारे फूड्स कंपनी’ उभारतो, कर्जही मिळवितो यशस्वी होतो. स्थानिक अमराठी आमदार कपाडिया (दर्शन जरीवाला) यांचा टिळक नगरमधील १०० टक्के मराठी रहिवाशांना हुसकावून लावून टोलेजंग इमारतीसाठी बांधकाम व्यावसायिकाला जागा विकण्याचा डाव राम पाठारेच्या लक्षात येतो आणि तिथूनच कपाडियाला ‘मर्द मराठा’ हिसका दाखविण्याचा तो चंग बांधतो आणि राजकारणात उतरतो.
वास्तविक विषय जुनाच आहे. किंबहुना मराठीच्या मुद्दय़ावरून सुरू झालेले राजकारण, मराठी शाळांची अवस्था, मराठी समाजाची आजची स्थिती, मराठी उद्योजक निर्माण व्हावेत म्हणून सुरू झालेले प्रयत्न इत्यादीची वास्तव पाश्र्वभूमी चित्रपटाला आहे. परंतु, दिग्दर्शकाने राम पाठारेचा ‘मर्द मराठा’ दाखवितानाच शिवाजी महाराजांनी केलेले पराक्रम, त्यांनी मुस्लिमांनाही सोबत घेऊन जाण्याचा केलेला प्रयत्न, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, शिवाजी महाराजांनी अफझल खान, शाहिस्तेखानाची कशी खोड जिरवली या गोष्टी आणि व्यक्तिरेखा आजच्या व्यक्तिरेखांमधून दाखविण्याचा वेगळा प्रयत्न केला आहे. सत् विरुद्ध असत् हाच संघर्ष दाखविताना रामायण, महाभारत आणि शिवचरित्रातील गोष्टींचा कथानकात केलेला वापर हेच या चित्रपटा
चे सामर्थ्य म्हणता येईल.
राम पाठारे ही व्यक्तिरेखा साकारणारा ‘मर्द मराठा’ राजेश शृंगारपुरेने बलदंड, शक्तिशाली नायक साकारला असून त्याचा पडद्यावरचा दमदार वावर प्रेक्षकाला भावतो. मराठी तरुणांची एकजूट करून गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनाही सुधारण्याचा राम पाठारे यशस्वी प्रयत्न करतो.
आपल्याबरोबर आपल्या चाळीतील मित्रांचा व त्यांच्या कुटुंबियांचाही उत्कर्ष व्हावा या हेतूने राजकारण, समाजकारण करण्याचा यशस्वी प्रयत्न करतो. वेगवान कथानक, त्याला साजेसे संगीत यामुळेही चित्रपट प्रेक्षकाला आवडेल. यापूर्वी माहीत झालेलेच मराठीविषयीचे मुद्दे चित्रपटातून मांडले असले तरी प्रेक्षकाला खुर्चीला खिळवून ठेवण्यात चित्रपट यशस्वी ठरतो. सुश्रुत मंकणीने, अंशुमन विचारेने यांच्याही भूमिका लक्षात राहणाऱ्या आहेत.
कथानकाच्या अनुषंगाने पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टी, घटनांचे दाखले देत सत् विरुद्ध असत् या संघर्षांत नायकाच्या सत्याची बाजू कशी जिंकते ते दाखविण्याचा दिग्दर्शकद्वयीचा प्रयत्न नक्कीच पाहायला हवा.
सुनील नांदगावकर - लोकसत्ता
रविवार, १३ नोव्हेंबर २०११
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
|