|

.

.

पणजी, ११ डिसेंबर २०११ ज्येष्ठ व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांचे रविवारी सकाळी लोटली (गोवा) येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन विवाहित मुलगे आहेत. मारिओंच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाला उद्या, सोमवारी अग्नी दिला जाणार आहे.
पद्मश्री (१९८८) आणि पद्मभूषण (२००२) या किताबांचे मानकरी ठरलेल्या मारिओ यांनी व्यंग्य शैलीत लोकजीवनाची चित्रे केली, त्यांची प्रदर्शने २२ देशांत भरली. अमेरिकेच्या सरकारी निमंत्रणावरून १९७४ मध्ये केलेला त्या देशाचा दौरा आणि तिथे ‘पीनट्स’ या कॉमिकचे निर्माते चार्ल्स शूल्ट्झ यांच्यासह काम करण्याची मिळालेली संधी ही आयुष्यातली मोठी उपलब्धी होती, असे मारिओ सांगत.
मुंबईला कर्मभूमी मानणारे मारिओ निवृत्तीनंतर गोव्यातच राहिले. मुंबईतले सहकारी गेऱ्हार्ड डकुन्हा, दिवंगत कादंबरीकार मनोहर माळगावकर अशा मोजक्या मित्रांनी मारिओ यांच्याविषयी वेळोवेळी लिखाण केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अभिजात लोकचित्रकार!
मारिओ मिरांडा यांनी अर्धशतकाहून अधिक काळ, भारतीयांना स्वत:चे, स्वत:च्या समाजजीवनाचे प्रतिबिंब ठरणारी चित्रे पाहण्यास प्रवृत्त केले. खरेतर, ही चित्रे मजेदार असू शकतात आणि ‘एन्जॉय’ करता येऊ शकतात, हे मारिओ यांच्याच चित्रांनी भारतीयांना शिकवले. तरीही भारतीय चित्रकलेतल्या आधुनिक कालखंडाच्या इतिहासात मारिओ मिरांडा यांच्या कार्टूनना स्थान मिळणार की नाही, हा प्रश्न आहेच आणि मारिओ गेल्यानंतरही काही वर्षे तो चर्चेत राहील.
दृश्यकलांची संकुचित व्याख्या भारतीयांनी वसाहतिक काळापासून स्वीकारली आहे. ब्रिटिशांच्या ‘रॉयल अकॅडमी’वादी कलाशिक्षण पद्धतीत सरकारी कलाशाळांनी जुजबीच बदल केल्यामुळे तोच संकुचित दृष्टिकोन दृढावत गेला आहे. मारिओ यांनी रूढार्थाने कलाशिक्षण घेतले असते, तर तेही कदाचित, आर्ट गॅलरीत मांडण्यासाठी कार्टूनपेक्षा निराळी चित्रे काढू लागले असते.
ब्रिटिशांच्या अमलाबाहेर, पोर्तुगीज मुलखात मारिओ जन्मले आणि वाढले, त्यामुळेच बहुधा त्यांनी स्वत:चे मुलखावेगळेपण वेळीच ओळखले. त्यावेळच्या गोव्यात ख्रिस्ती वळणाच्या चित्रांखेरीज कुठलाही प्रभाव दृश्यकलेवर नव्हता. काही पोर्तुगीज नवचित्रकारांनी ख्रिस्ती विषय मांडताना या चित्रांमधल्या पात्रांचे चेहरे आणि डोळे ठसठशीतपणे दाखवायला सुरुवात केली होती. बाह्य़रेषेचा वापर होऊ लागला होता आणि रंगभरण रेषेच्या आगेमागे करायचे आहे, रंगांतून चित्र उभे करण्याची जुनी पद्धत वापरायची नाही, याची जाणही त्या चित्रांत वाढू लागली होती.
दुसऱ्या महायुद्धाआधीच्या काळातल्या पोर्तुगीज चित्रांशी मारिओ यांचा संबंध इथेच सुरू होतो आणि इथेच संपतोही. कशाचे चित्र काढायचे, हे मारिओ यांना लवकर कळू लागले, म्हणून प्रभावही मर्यादित राहू शकले. बंगळुरूमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर मारिओ १९५१ या संपूर्ण वर्षांत गोव्यामध्येच ठिकठिकाणी राहिले. नातेवाईक, मित्रमंडळी यांचा पाहुणचार घेत, गोवन समाजजीवनाची रेखाटने करत फिरले. या रेखाटनांचे पुस्तकही पुढे प्रकाशित झाले आहे.
आज सर्वपरिचित असलेली ‘मारिओ मिरांडा शैली’ कशी घडत गेली, हे या १९५१च्या चित्रांमधून दिसते. अगोदर युरोपीय आणि अमेरिकी रेखाचित्रांचा बाज हाताळून पाहणाऱ्या मारिओंनी १९५१ मध्ये लोकजीवन स्वत: पाहून भरपूर रेखाटने करण्यासाठी सुलभीकरणाचे स्वत:चे मार्ग निवडले. रेषांच्या ठरावीक वळणांतूनच मग माणसे त्यांच्या चित्रांत उतरू लागली. चेहरे बदामासारख्या निमुळत्या आकाराचे, पण हनुवटी गोल आणि डोळे तर माशांच्या डोळय़ासारखे गटाणे, असा एक समाज मारिओंच्या चित्रांत दिसू लागला. माणसाचा स्थूलपणा, लुकडेपणा, ‘सेक्रेटरी’चे काम करणाऱ्या युवतीचा हुकमी कमनीयपणा ही शारीर वैशिष्टय़े दाखवण्यासाठी मारिओ यांची परिमाणे अधिकाधिक ठाशीव आणि ठरीवसुद्धा होऊ लागली.
रेखाटनाची ही वैशिष्टय़े, म्हणजे मारिओंच्या शैलीची मुळाक्षरे. त्यांनी जे शैलीविधान केले, ते आणखी पुढले आणि आणखी वरच्या दर्जाचे आहे. मारिओंनी आधुनिक भारतीय जीवनाची समाजचित्रे करताना, एकेका माणसात केवढा परस्परविरोध भरलेला असतो, यावर अचूकपणे बोट ठेवले! समाजात वावरतानाही माणसांची ही ‘फ्लिप साइड’ कशी दिसून येते, हे मारिओंनी नेमकेपणाने वेळोवेळी दाखवले. त्यामुळेच मारिओंचे प्रत्येक समाजचित्र बारकाईने पाहण्याजोगे ठरले. ‘मोजक्या रेषांनी व्यंगचित्र उभे करावे’ वगैरे तत्कालीन संकेत - जे बाळ ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण या व्यंगचित्रकारांमुळे मापदंडांसारखेच झाले होते, ते - मारिओंनी सहज धुडकावलेच आणि भरपूर छोटय़ा रेषा, क्वचित डिझाइन आणि पोत यांचेही सूचन असणारी भरगच्च चित्रे केली. नेमकेपणापेक्षा खूपच निराळय़ा या वाटेवर मारिओ का गेले, याचे कारण त्यांच्या चित्रांनीच पुढे स्पष्ट केले :
जगावर प्रेम करताना प्रत्येक चल-अचल बारकाव्याचे निरीक्षण आणि त्यावरही प्रेम, हे या चित्रांतल्या भरगच्चपणाचे गमक ठरले. ‘जातीपातींमध्ये विभागलेला, आर्थिक विषमतांत अडकलेला बहुविध समाज मारिओंनी चितारला, पण माणसाचे माणूसपण मात्र नेमके अधोरेखित केले’ असे कलासमीक्षक रणजित होस्कोटे यांनी म्हटले आहे, त्यातली बहुविधता चित्रांच्या भरगच्चपणामुळेच येते. मारिओंनी अनेक वर्षे वृत्तपत्रांसाठी एका रकान्याची ‘पॉकेट कार्टून’ केली आणि तीन चित्रांच्या मालिकाही चालवल्या.
बॉस, सेक्रेटरी, कारकून अशी ठरावीकच पात्रे त्यात असत. सेक्रेटरी अगदी टंच म्हणावीशी असूनही अश्लीलतेची ओरड या चित्रांविरुद्ध झाल्याचे ऐकीवात नाही. लोक जसे असतात, तसेच चित्रांत दिसावेत आणि चित्र म्हणून त्यात आणखी फेरफार करू नयेत, हे सूत्र मारिओंच्या चित्रांनी पाळले होते, म्हणूनच ‘प्रक्षिप्त चित्रणा’च्या आरोपांपासून मारिओ नेहमी दूर राहिले.
मुंबईत एका जाहिरात संस्थेत काम करणाऱ्या मारिओंनी कुठल्याच कामाला नाही म्हटले नाही खरे, पण जे काम केले ते वैशिष्टय़पूर्ण. याचे कारण, ‘हे मारिओच करू जाणोत’ अशी कामेच त्यांच्याकडे आली. मुंबईतल्या ‘माँदेगार’ किंवा अन्य रेस्तराँमधली भिंतचित्रे (म्युरल) असोत की एका थर्मास कंपनीच्या ‘ट्रॅव्हल इन इंडिया’ या मालिकेसाठीची चित्रे, इलस्ट्रेटेड वीकलीमधली बोधचित्रे (इलस्ट्रेशन) असोत की पाठय़पुस्तकांमधली धडय़ा- कवितांसोबतची चित्रे, मारिओंनी सर्वत्र आपला ठसा उमटवलाच.
उतारवयात मारिओ यांनी आर्ट गॅलऱ्यांत प्रदर्शित होऊ शकतील, अशा चित्रांकडे लक्ष केंद्रित केले. गोवा, मुंबईखेरीज जिथे जिथे प्रवास करतील, तिथली चित्रे मारिओ करत असत. यापैकी गोव्याच्या चित्रांचा संच छापील स्वरूपातही उपलब्ध आहे. मारिओंच्या गोव्यात माडांच्या झावळय़ाही जणू प्रसन्नपणे झुलतात आणि निळय़ा आकाशातला शेंदरी सूर्यसुद्धा आजचा दिवस सुशेगाद आहे हेच सांगत असतो.
प्रसन्नपणा मारिओंच्या अन्य अनेक चित्रमालिकांमध्ये दिसतो. माणसातल्या विरोधाभासांचे त्यांचे निरीक्षणही दिसतेच. म्हणून तर, मारिओंच्या चित्रातला गिटार वाजवून पैसे कमावू पाहणारा पथवादक पिकासोच्या ‘ब्लू पीरियड’मधल्या मेंडोलिनवाल्यासारखा खिन्न, उदास दिसत नाही.. जगाबद्दलची त्याची बेफिकिरी मारिओंनी अचूक पकडलेली असते. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळातल्या भारताचा चेहरा मारिओंच्या चित्रांतून चटका लावतो, तो असाही!
मारिओंनी आजच्या आयटी-काळाची आणि एकविसाव्या शतकाची चित्रे केलीच नाहीत, अशी टीका जरूर होईल, परंतु मारिओंनी १९६० च्या दशकातल्या विसंगतीपूर्ण जीवनाचे जे दर्शन घडवले, त्याला पुढे अभिजाततेचे मूल्य प्राप्त होईल. कलाकाराने निव्वळ वैशिष्टय़पूर्ण शैलीवर न थांबता मानवी जीवनाबद्दल आणि एका काळाबद्दल भाष्य करणे, ही अभिजाततेची पूर्वअट मारिओंनी कधीच पूर्ण केल्याचे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चित्रांचा अभ्यास करणाऱ्यांना स्पष्ट होईल.
अभिजित ताम्हणे - लोकसत्ता
|