८५ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कवी श्री. वसंत आबाजी डहाके यांची निवड Print E-mail
यांच्या द्वारा - लोकसत्ता प्रतिनिधी   

मुंबई, १६ डिसेंबर २०११ / प्रतिनिधी
alt

चंद्रपूर येथे २, ३ आणि ४ फेब्रुवारी २०१२ असे तीन दिवस होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांची निवड करण्यात आली असून त्यांना सर्वाधिक ३७४ मते मिळाली.  यानिमित्ताने लघु नियतकालिक चळवळीतील साहित्यिकास प्रथमच संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला आहे.

यंदाच्या संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डॉ. प्रतिमा इंगोले, प्रा. जवाहर मुथा यांनीही अर्ज दाखल केले होते. एकूण ५६९ मतपत्रिका  महामंडळाला प्राप्त झाल्या. त्यापैकी १९ मतपत्रिका अवैध ठरल्या. वैध ठरलेल्या ५५९ मतपत्रिकांमधून सर्वाधिक ३७४ मते वसंत आबाजी डहाके यांना मिळाली तर डॉ. प्रतिमा इंगोले यांना १५९ आणि प्रा. जवाहर मुथा यांना केवळ १७ मते मिळाल्याचे निर्वाचन अधिकारी डॉ. यशोधन दिवेकर यांनी पत्रकार परिशदेत सांगितले.

यंदाचे ८५ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे होणार असून सर्वोदय शिक्षण मंडळ आणि सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट या साहित्य संमेलनाच्या आयोजक संस्था असल्याची माहिती आज देण्यात आली.  साहित्य संमेलनाचे उद्घाटक आणि स्वागताध्यक्षपदाचे नाव नंतर जाहीर केले जाणार आहे. दरम्यान  माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे हे आयोजक संस्थेचे प्रमुख असून त्यांचे नाव स्वागताध्यक्षपदासाठी घेतले जात आहे.     


‘साहित्य संमेलन केवळ उत्सव नाही तर विचारांचे व्यापक व प्रभावी व्यासपीठ’

सोलापूर: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे उत्सवाचे व्यासपीठ म्हणून पाहण्याची भावना वाढत चालली असून हे योग्य नाही. त्याकडे विचारांचे प्रभावी, व्यापक व अधिकृत व्यासपीठ म्हणून पाहण्याची गरज असून या एवढय़ा मोठय़ा व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या मनातील विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याची संधी सन्मानासह मिळाली, याचा जास्त आनंद वाटत आहे, अशा शब्दांत  साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी मनोगत मांडले.

संमेलनाध्यक्षपदाच्या विजयाचे श्रेय महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या त्नॠण मित्रांना देत या मित्रांनीच हा आनंदाचा क्षण मिळवून दिला. त्याचे प्रथमत: अभिनंदन करतो. या सन्मानासाठी आपण स्वत: कुठे हिंडलो-फिरलो नाही. केवळ मित्रांनी हा सन्मान मिळवून दिल्याचे डहाके यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.

चतुरस्र साहित्यिकाला संधी!

शिक्षण, अध्यापन आणि साहित्य विश्वातील एक प्रतिथयश नाव म्हणून वसंत आबाजी डहाके महाराष्ट्रात सर्वपरिचित आहेत. कथा, कविता, निबंध, संपादन, कादंबरी असे विविधांगी साहित्यप्रकार लीलया हातळताना त्यांच्यात दडलेला साहित्यिक अधिक परिपक्व होत गेला. ३० मार्च १९४२ रोजी वणी तालुक्यातील बेलोरा वसंत आबाजी डहाके यांचा जन्म झाला.

चंद्रपूर जिल्ह्य़ात शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांच्या लेखणीला जशी संधी मिळाली तसे त्यांचे लेखन बहरत गेले. मूळ पिंड कवीचा असल्याने त्यांच्या कवितांना साहित्य क्षेत्रात हळूहळू मान्यता मिळत गेली.
१९७२ साली त्यांचा ‘योगभ्रष्ट’ कवितासंग्रह प्रकाशित झाला. यानंतर त्यांचे शुभ वर्तमान (१९८७), शुन:शेप (१९९६), चित्रलिपी (२००६) हे कवितासंग्रह साहित्यप्रेमींचा ठाव घेणारे ठरले.

‘योगभ्रष्ट’ कवितासंग्रहाचे इंग्रजी भाषांतर ‘टेररिस्ट ऑफ स्पिरिट ’ १९९२ साली प्रकाशित झाले. कादंबरी लेखनात पाऊल टाकल्यानंतर त्यांच्या ‘अधोलोक’ (१९७५), ‘प्रतिबद्ध आणि मर्त्य’ (१९८१) या कादंबऱ्यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवले. ‘मालटेकडीवरून’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह (२००९) प्रकाशित झाला. साहित्यतील समीक्षा हा वाङ्मय प्रकार त्यांनी उत्कृष्ट हाताळला. ‘समकालीन साहित्य’ (१९९२), ‘कवितेविषयी’ (१९९९), ‘मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती’, ‘मराठी समीक्षेची सद्य:स्थिती’ (२०११) या त्यांच्या समीक्षा साहित्यातील मैलाचा दगड ठरल्या आहेत.

निबंध लेखनातही ठसा उमटवताना त्यांनी ‘यात्रा - अंतर्यात्रा’ (१९९९९) या निबंधातून स्वत:ची वेगळी ओळख करून दिली. संपादन हाताळताना त्यांनी ‘निवडक सदानंद रेगे’ (१९९६), संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश (खंड १ ते ३, १९९८, २००४), ‘वाङ्मयीन संज्ञा - संकल्पना कोश’  (२००१), ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : अ फोटोबायोग्राफी’ चे संपादन केले.

साहित्य क्षेत्रात दिलेल्या चतुरस्र योगदानासाठी वसंत आबाजी डहाके यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कादंबरी आणि कविता लेखनासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्काराने १९८१ आणि १९८७ साली गौरवण्यात आले. २००५ साली त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार प्राप्त झाला. विदर्भ साहित्य संघाने त्यांना २००९ साली जीवनव्रती या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविले. ‘चित्रलिपी’साठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला.

याशिवाय कविवर्य अत्युत कारे आणि पुणे मराठी ग्रंथालयाचे पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानने २०१० साली त्यांचा शांता शेळके पुरस्काराने गौरव केला. प्रारंभीच्या काळात चंद्रपूर आणि अमरावतीला अध्यापन केल्यानंतर मुंबईत शासकीय महाविद्यालयात व्याख्याता म्हणून त्यांनी १९७१ ते २००२ पर्यंत काम केले. याच काळात ज्येष्ठ साहित्यिक प्रभा गणोरकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

वसंत आबाजी डहाके यांनी मुंबईतील स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स,  मुंबई विद्यापीठ आणि पुण्याच्या यशदातही अध्यापन करून ठसा उमटवला आहे.

लोकसत्ता

 
Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates