|
यांच्या द्वारा - आशा कबरे-मटाले
|
|
कहाणी एका 'कांता'ची! -महाराष्ट्र टाइम्स दिनांक 27.7.2009  ही कहाणी 'कांता'ची आहे. पण कुठल्याही मध्यमवर्गीय नोकरीपेशा घरात ही दुर्दैवी घटना घडती तर अशीच परिस्थिती ओढवली असती, हे निश्चित. स्टेनोग्राफर म्हणून सरकारी विमा कंपनीत रुजू होऊन कालांतराने ऑफिसर बनलेली कांता... अशा स्त्रिया आपल्याकडे घरोघरी सापडतील. अशा स्त्रीच्या वाट्याला अपघातातून कायमस्वरुपी बिछान्याला खिळून राहणं आलं तर...?
९ ऑक्टोबर २००६ रोजी कांताच्या स्कूटीला टँकरने उडवलं. तेव्हापासून तिच्या मेंदूवर जोखमीच्या अशी दोन ऑपरेशन झाले. प्रत्येकवेळेस दीड-दीड, दोन-दोन महिने हॉस्पिटलमध्ये वास्तव्य, घरी परतल्यावरही फूड पाइप, कॅथेटर आहेच. कवटीचा काही भाग कृत्रिमरित्या रोपण केल्याने साधं कुशी वळणंही अशक्य. बोलणं तर दूरच, पण प्रतिसादही नाही... अशा अवस्थेतून आपल्या पत्नीला संथ गतीने का होईना पण 'रिकव्हर' करण्यासाठी जिवापाड धडपडणारा पती. किशोर मोहिते मात्र प्रयत्नांपासून तसूभरही ढळलेले नाहीत. सिंधी कुटुंबातून आपल्या महाराष्ट्रीय कुटुंबात येऊनही सहजपणे सामावून गेलेल्या, सांसारिक वाटचालीसोबतच कारकीदीर्त पुढे जाण्यासाठीही प्रेरित करणाऱ्या आपल्या अर्धांगिनीला मेंदूला जबर दुखापत झाल्यानंतरही परमेश्वराने जिवंत ठेवले आहे, याचे ऋण मनोमन जपत त्यांनी तिच्या सुश्रूषेचे व्रत अंगिकारले आहे. सरकारी विमा कंपनीत 'असिस्टंट मॅनेजर' पदावरच्या मोहिते यांच्यासाठी ऑपरेशनखेरीज घरीही कराव्या लागणाऱ्या देखभालीचा खर्च किती क्षमतेपलीकडचा असेल हे संबंधित आकड्यांवर नजर टाकल्यावर सहज लक्षात येतं. नर्स, आया, फिजिओथेरपिस्ट, औषधं आणि अन्य वैद्यकीय सामग्री असे सारे मिळून त्यांना महिन्याला सुमारे ४१ हजार रु. खर्च करावे लागतात. उपचारांकरिता प्रोव्हिडंट फंड, बँक आदींकडून कर्ज घेऊन बसलेल्या मोहितेंच्या हातात पगारातले फक्त १० हजार रु. पडत असल्याने हा खर्च त्यांना आता जिकिरीचा जातोय. म्हणूनच आपली व्यथा त्यांनी 'हेल्पकांता डॉट कॉम' (http://helpkanta.com) या वेबसाइटमार्फत जाहीर केली आहे. आपल्या अर्धांगिनीला पूर्ववत उभे करण्यावर ते ठाम आहेत. पण त्यांच्या निग्रहाला आथिर्क बळाचीही जोड हवी आहे. म्हणूनच ज्यांना शक्य आहे त्यांनी जमेल तेवढी मदत करावी, असं त्यांनी विनवले आहे. मोहितेंशी ९८१९१४६९८७ या मोबाइलवरही संपर्क साधता येईल.
|